डायबेटिक रेटिनोपथी (मधुमेहमूलक नेत्रपटलक्षती)(Diabetic Retinopathy in Marathi)

डायबेटिक रेटिनोपथी (मधुमेहमूलक नेत्रपटलक्षती: Diabetic Retinopathy) म्हणजे काय? त्यापासून बचाव कसा करता येईल?

मधुमेही रुग्णांच्या रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे अनेक अवयवांना इजा पोचून ते खराब होऊ शकतात. यालाच वैद्यकीय भाषेत मधुमेही गुंतागुंती (डायबेटिक काँप्लीकेशन्स:diabetic complications) म्हणतात. हृदय, मूत्रपिंड, डोळे, पाय अशा अनेक अवयवांचे नुकसान होऊ शकते. मधुमेही रुग्णांना होणाऱ्या अनेक गुंतागुंतींपैकी एक म्हणजे मधुमेही नेत्ररोग (डायबेटिक रेटिनोपथी).

आपण फक्त जर डोळ्यांचा विचार केला तर मधुमेही रुग्णांना मुख्यतः ३ प्रकारचे नेत्ररोग होण्याची शक्यता असते. ते असे:

  1. डायबेटिक रेटिनोपथी (मधुमेह-मूलक नेत्रपटल-क्षती: Diabetic Retinopathy). यामध्ये डोळ्यांच्या पडद्यावरील केशवाहिन्या केशवाहिन्या खराब होतात आणि उपाययोजना न केल्यास शेवटच्या टप्प्यात अंधत्व येऊ शकते.
  2. मोतीबिंदू (Cataract). यामध्ये डोळ्यांची भिंगे आधी दुधाळ आणि कालांतराने अपारदर्शी होतात
  3. काचबिंदू (Glaucoma) यामध्ये डोळ्यांच्या गोलातील पोकळीत असणाऱ्या द्रवाचा दाब प्रमाणाबाहेर वाढून दृष्टीशी संबंधित मज्जातंतूना इजा होऊन (optic nerve damage) अंधत्व येऊ शकते.

डायबेटिक रेटिनोपथीची (मधुमेही नेत्ररोग) लक्षणे कोणती?

जर तुम्हाला मधुमेह झालेला असेल तर डायबेटिक रेटिनोपथी हा विकार झाला असेल का? झालाय की नाही हे कसे ओळखावे? काय लक्षणे असतात? लक्षात घ्या, की डायबेटिक रेटिनोपथी या विकाराची सुरुवात झाल्यावरही काही वर्षे लक्षणे दिसत नाहीत. पण लक्षणे दिसत नसली तरी डोळे खराब होणे सुरूच असते. तुमची दृष्टी चांगलीच आहे असे तुम्हाला वाटते. जेव्हा नेत्रपटलाचे बरेच नुकसान झालेले असते तेव्हाच तुम्हाला डोळ्यापुढे कापसाच्या पुंजक्यासारखे डाग दिसू लागतात. यावेळीही उपाययोजना नाही केली तर मात्र अंधत्व येऊ शकते.

डायबेटिक रेटिनोपथी (diabetic retinopathy) टाळता येते का?

डायबेटिक रेटिनोपथी या विकाराची सुरुवात झाल्यावरही काही वर्षे लक्षणे दिसत नाहीत म्हणूनच ज्यांना मधुमेह झालेला आहे अशा सर्वांनी दर सहा महिन्यांनी (किंवा कमीत कमी एक वर्षाने तरी) नेत्रतज्ञाकडून नेत्रतपासणी करून घ्यावी. असे केल्याने आणि आपल्या रक्तातली साखर आटोक्यात ठेवल्याने डायबेटिक रेटिनोपथी (diabetic retinopathy) नक्की टाळता येते!

तुम्ही आहात पाहुणा क्रमांक: