इन्सुलिन म्हणजे काय? What is insulin? (Marathi Info)

madhumeha diabetes insulin injection मधुमेह पोटावर इन्सुलिन इंजेक्शन (diabecity.com)

इन्सुलिनचं कार्य (The functions of insulin)

आपल्या शरीरात चालणारं इन्सुलिनचं कार्य ज्याला समजलं त्याला मधुमेहाविषयी अर्ध्याहून अधिक ज्ञान प्राप्त झालं असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये इतकं महत्व या जादुई पदार्थाला आहे. आपल्या शरीरात अनेक गोष्टींना योग्य त्या प्रमाणात राखण्यासाठी निसर्गाच्या अनेक स्वचलित यंत्रणा सदैव २४ तास कार्यरत असतात. उदा. शरीराचे तापमान, रक्तदाब, वगैरे असंख्य गोष्टींना योग्य त्या प्रमाणात ठेवण्यासाठी अनेक संप्रेरके किंवा हॉर्मोन्स सक्रीय असतात. रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मुख्यतः दोन संप्रेरके किंवा हॉर्मोन्स कार्यरत असतात:

इन्सुलिन रक्तशर्करा कमी करतं तर ग्लुकॅगाॅन ती वाढवतं. रक्तशर्करा वाढली की स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रवतं आणि ते शरीरभर विविध पेशींचे दरवाजे साखरेला आत शिरण्यासाठी उघडण्याचं काम करतं, त्यामुळे रक्तातली साखर पेशींमध्ये घुसते, आणि रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेली साखर कमी होते. पेशींचे दरवाजे उघडण्याचं काम फक्त इन्सुलिनमुळेच शक्य होतं. (याच कारणामुळे इन्सुलिन नसेल तर साखर पेशींमध्ये न शिरता रक्तातच राहते, त्यामुळे तिची रक्तातली पातळी वाढते, मधुमेहात हीच अवस्था येते). आता याउलट काही कारणाने रक्तशर्करा कमी झाली की स्वादुपिंडातून ग्लुकॅगाॅन स्त्रवतं आणि त्यामुळे कमी झालेली साखर वाढून योग्य पातळीला येते. अर्थात हे सर्व निरोगी व्यक्तीच्या बाबतीत होतं. मधुमेही व्यक्तींच्या बाबतीत इन्सुलिनचं प्रमाण कमी असतं आणि तेही कमी परिणामकारक असतं. परिणामी साखर सतत वाढलेल्या पातळीवर राहते. बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन देऊन ही वाढलेली साखर कमी करता येऊ शकते, पण, मधुमेहाची सुरुवात झालेली असते तेव्हा अनेक वर्षेपर्यंत बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन न घेता आहार-नियंत्रण, व्यायाम आणि औषधांच्या सहाय्याने रक्तातली साखर आटोक्यात ठेवता येते. जेव्हा या तीन गोष्टींनी ती आटोक्यात येत नाही, तेव्हा मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन घेतल्यानेच रक्तातली साखर आटोक्यात येते.

इन्सुलिनचा यकृतावर असलेला प्रभाव

इन्सुलिन हे रक्तातली साखर कमी करण्याचं महत्वाचं काम करतंच पण त्याचबरोबर ते यकृतामध्ये तयार होणाऱ्या साखरेचं प्रमाणही कमी करतं. आपण जेव्हा जेवत खात नसतो, तेव्हा शरीराला लागणारी साखर यकृत तयार करून रक्तात पाठवतं. पण ही साखर जेव्हा मर्यादेबाहेर वाढते, तेव्हा, इन्सुलिन यकृताला साखर तयार करायला अटकाव करतं! मधुमेही व्यक्तीमध्ये इन्सुलिन कमी प्रमाणात किंवा कमी प्रभावी असल्यामुळे किंवा प्रकार १ मध्ये अजिबात नसल्यामुळे, यकृतातला साखर कारखाना सुरूच असतो. इन्सुलिन इंजेक्शनमुळे या साखरेचं उत्पादन कमी केलं जातं.

इन्सुलिनचा चरबी साठवणाऱ्या (adipocytes) पेशींवर असलेला प्रभाव

उर्जेच्या वापरासाठी शरीर ग्लुकोज साखर आणि चरबी (fat) चा वापर करतं. इन्सुलिन चरबीच्या पेशींमधली चरबी बाहेर काढून रक्तात आणण्याच्या कार्याला विरोध करतं, त्यामुळे ती पेशींमध्येच साठून राहते. आणि रक्तातल्या ग्लुकोजची चरबीच्या पेशींमध्ये चरबीच्या रुपात साठवणूक करायला मदत करतं. यामुळेच इन्सुलिन इंजेक्शनचं प्रमाण वाढलं की अतिरिक्त भूक लागून जास्त खाल्लं जातं आणि वजन (चरबीच्या रूपाने) वाढतं! म्हणून इन्सुलिन योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे.

madhumeha diabetes insulin injection मधुमेह पोटावर इन्सुलिन इंजेक्शन (diabecity.com)

इन्सुलिनची रासायनिक रचना

इन्सुलिन हा एक प्रथिन पदार्थ असून तो अ‍ॅमिनो अम्‍लांच्या दोन शृंखलांचा मिळून बनलेला आहे. A शृंखलेमध्ये २१ अ‍ॅमिनो अम्‍ले असून B शृंखलेमध्ये ३० अ‍ॅमिनो अम्‍ले असतात. नेहमीच्या अ‍ॅमिनो अम्‍लांपैकी मिथिओनाइन, ट्रिप्टोफॅन, हायड्रॉक्सिप्रोलीन ही अ‍ॅमिनो अम्‍ले मात्र इन्सुलिनच्या रेणूमध्ये नसतात. या दोन शृंखला दोन ठिकाणी एकमेकीस जोडलेल्या असून हे जोड दोन गंधक अणूंच्या —S—S— या दुव्याने जोडलेले असतात. इन्सुलिनचा रेणूभार (molecular weight = 5734) ५७३४ असतो.

इन्सुलिनचा शोध

इन्सुलिनचा शोध लागण्यापूर्वी म्हणजेच इ. स. १९२१ च्या आधी मधुमेही रुग्ण फार काळ जगत नसत. आणि त्यावेळी फारशी औषधेही नव्हती. डॉक्टर्स फार काही करू शकत नसायचे. पाश्चात्य देशांत त्या काळची सर्वात परिणामकारक उपाययोजना म्हणजे रुग्णाला अतिशय कमी कर्बोदकांचा आणि कमी कॅलरीज असलेला आहार दिला जायचा. यामुळे रुग्ण फक्त काही वर्षे किंवा महिने जास्त जगायचा, पण अकाली मरण हे ठरलेलेच असायचे! भारतातही काही फारसे वेगळे चित्र नव्हते. मेथ्या, जांभूळ, दालचिनी, कारले वगैरे गोष्टींचा औषधासारखा उपयोग केला जायचा! (दुर्दैवाने तो अजूनही केला जातो! एवढे प्रचंड ज्ञान, एवढी औषधे, इन्सुलिन असे सर्व उपलब्ध असूनही अज्ञान आणि भीतीमुळे हे केले जाते.) इन्सुलिन हा खरोखरच एक अद्भुत असा जैविक पदार्थ असून तो शरीरातच तयार होतो. पण १९२१ नंतर तो माणसालाही कृत्रिमपणे प्रयोगशाळेत करता येऊ लागला. इन्सुलिनचा शोध कसा लागला याची कहाणी खूपच रंजक आणि गमतीदार आहे.

इन्सुलिनला हे नाव कसे मिळाले?

इ. स. १८८९ मध्ये ऑस्कर मिन्कोवस्की (Oskar Minkowski) आणि जोसेफ वाॅन मेरिंग (Joseph von Mering) या दोन जर्मन संशोधकांनी एका कुत्र्याचे स्वादुपिंड (pancreas) काढून टाकले. तेव्हा त्यांना त्या कुत्र्यामध्ये मधुमेहाची लक्षणे दिसू लागली आणि काही दिवसांनी तो कुत्रा मरण पावला. यावरून त्यांच्या लक्षात आले की स्वादुपिंड किंवा पॅंक्रियाज (pancreas) हाच तो शरीरातला अवयव आहे जिथे इन्सुलिन तयार होते आणि ज्याच्याशी मधुमेहाचा संबंध आहे. अधिक संशोधन केल्यानंतर असे लक्षात आले की स्वादुपिंडातील काही विशिष्ट पेशी इन्सुलिन संप्रेरकाची निर्मिती करतात. या पेशींच्या समूहाला आयलेट्स आॅफ लॅंगरहॅन्स (islets of Langerhans) असे नाव दिले गेले. (१८६९ मध्ये पॉल लँगरहॅन्स नामक जर्मन शास्त्रज्ञाने या पेशींचा शोध लावला होता, त्यामुळे त्याच्या सन्मानार्थ हे नाव दिले गेले). इ. स. १९१० मध्ये सर एडवर्ड अल्बर्ट शार्पी शेफर (Sir Edward Albert Sharpey-Shafer) या शास्त्रज्ञाने इन्सुला (insula) या लॅटिन शब्दापासून इन्सुलिन (insulin) हे नाव दिले (insula या लॅटिन शब्दाचा अर्थ island असा होतो).

इन्सुलिनचा पहिला वापर मधुमेही कुत्र्यांवर!

पुढे फ्रेडरिक बँटिंग नावाचा थोर डॉक्टर आणि त्याचा विद्यार्थी चार्ल्स बेस्ट यांनी इन्सुलिनच्या संशोधनात आणि मधुमेहाच्या उपचारात अत्यंत क्रांतिकारी कार्य केले. त्यांना इन्सुलिनच्या उगमस्थानाबाद्दलची पुसटशी कल्पना होती. त्यांना हे ठावूक झाले होये की स्वादुपिंड नामक अवयवात एक पदार्थ तयार होतो, जो रक्तातल्या साखरेला नियंत्रणात ठेवतो. पण त्यांना प्रत्यक्ष पडताळणी करायची होती. यासाठी त्यांना प्रो. जॉन मॅक्लिओड या शास्त्रज्ञाची खूप मदत झाली. इ. स. १९२१ मध्ये कॅनडामध्ये टोरांटो विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत त्यांनी कुत्र्याच्या स्वादुपिंडापासून इन्सुलिन वेगळे काढले. दुसऱ्या एक कुत्र्याचे स्वादुपिंड काढून त्याला मधुमेही बनविले. पहिल्या कुत्र्यापासून काढलेले इन्सुलिन त्यांनी दुसऱ्या मधुमेही कुत्र्याला टोचले आणि काय आश्चर्य! मधुमेही कुत्र्याच्या रक्तातली साखर कमी होऊ लागली! आणि पहिल्यांदाच प्राण्यामध्ये का होईना, पण मधुमेहावर रामबाण औषध सापडले! हा शोध म्हणजे मानवासाठी वरदानच होता! अगदी अँटिबायोटिक्स (प्रतिजैविके) च्या शोधाइतकेच इन्सुलिनच्या शोधाचेही महत्व आहे! इन्सुलिनचा शोध लावल्याबद्दल फ्रेडरिक बँटिंग आणि जॉन मॅक्लिओड यांना १९२३ सालचे शरीरक्रियाशास्त्राचे (Physiology) नोबेल पारितोषिक मिळाले.

शरीरातलं इन्सुलिन आणि इंजेक्शनद्वारे टोचून घेतलं जाणारं इन्सुलिन यात काय फरक असतो?

दोन्ही इंसुलीनांचं कार्य एकसारखंच असतं - ते म्हणजे रक्तवाहिन्यांमधली अतिरिक्त (ग्लुकोज) साखर कमी करून ती इतरत्र नेऊन ठेवणे. पण दोघांच्या रासायनिक रचनेत आणि उत्पादन प्रक्रियेत फरक असतो. बाहेरून घ्यायचे इन्सुलिन हे पूर्वी डुकराच्या (वराहजन्य) किंवा गायी-बैलांच्या (गोजन्य) स्वादुपिंडातून काढलेले असायचे. मानवी शरीरातील इन्सुलिन आणि वराहजन्य इन्सुलिन यांच्या रासायनिक रचनेमध्ये एका अमिनो आम्लाचा तर गोजन्य आणि मानवी शरीरातील इन्सुलिन यांच्या रासायनिक रचनेमध्ये तीन अमिनो आम्लांचा फरक असतो. या कारणामुळे वराहजन्य इन्सुलिन हे मानवी शरीरासाठी गोजन्य इन्सुलिनपेक्षा कमी अॅलर्जिक असते.

मानवी, गोजन्य आणि वराहजन्य इन्सुलिन

मानवी शरीरातलं, गायी-बैलांच्या स्वादुपिंडापासून काढलेलं(गोजन्य) आणि डुकराच्या स्वादुपिंडापासून काढलेलं (वराहजन्य) इन्सुलिन यातला फरक आपण वरच्या परिच्छेदात पाहिला. अलीकडच्या काळात भरपूर संशोधन झाल्याने परिस्थिती खूप बदलली आहे. आता माणसाच्या इन्सुलिनसारखेच बायोटेक्नॉलोजीचा वापर करून मोठ्या प्रमाणात मानवी इन्सुलिनचे उत्पादन करणे शक्य झाले आहे. हे इन्सुलिन मानवी शरीराकडून अस्वीकृत (regect) केले जाण्याची व अ अॅलर्जीची शक्यता नसते. ते जास्त घनतेचे असल्याने कमी डोसमध्ये काम भागते त्यामुळे ते स्वस्त पडते.

मानवी इन्सुलिन कारखान्यात कसे तयार होते त्याची माहिती

मानवी इन्सुलिन कारखान्यात कसे तयार होते ते यूट्यूबवर इथे पहा.

रॅपिड अॅक्टिंग आणि मिश्र प्रकारचं इन्सुलिन यात काय फरक असतो? सर्व इन्सुलिनांचा परिणाम सारखाच असतो का?

सर्व खटाटोप हा रक्तशर्करेची पातळी जास्तीत जास्त काळासाठी स्थिर आणि नियंत्रणात राखण्यासाठी असतो, मग तो औषधाने, आहाराने, व्यायामाने , इन्सुलिनाने किंवा तिघांच्या एकत्रित वापराने केला तरी! इन्सुलिनचे (इंजेक्शनचे) शीघ्र आणि मंद असे मूलभूत प्रकार असतात. तिसरा प्रकारही असतो तो या दोहोंच्या मिश्रणाने तयार होतो- त्याला मिश्र इन्सुलिन म्हणतात. मिश्र इन्सुलिनमध्ये दोन मुख्य प्रचलित उपप्रकार असतात: ह्युमन मिक्सटार्ड ३० ( human mixtard 30) आणि ह्युमन मिक्सटार्ड ५० ( human mixtard 50). पहिल्या प्रकारात ३० टक्के शीघ्र आणि ७० टक्के मंद असे प्रमाण असते तर दुसऱ्या प्रकारात ५० टक्के शीघ्र आणि ५० टक्के मंद असे प्रमाण असते. ह्युमन मिक्सटार्ड ३० हा प्रकार जास्त प्रचलित आणि लोकप्रिय आहे. याचं कारण असं की अनेक रुग्णांची रक्तशर्करा या प्रकारच्या इन्सुलिनच्या उपयोगाने बऱ्यापैकी स्थिर आणि नियंत्रणात राहिली आहे. ७० टक्के मंद इन्सुलिन दीर्घकाळासाठी ८ ते १२ तास साखर नियंत्रणात ठेवतं आणि ३० टक्के शीघ्र इन्सुलिन जेवणामुळे वाढलेली साखर ३-४ तासांकरिता नियंत्रणात ठेवतं! दोन्हींचा परिणाम असा होतो की मधुमेही रुग्णाची साखर सदैव नियंत्रणात राहू शकते. अर्थात प्रत्येक रुग्णाची प्रकृती भिन्न असल्यामुळे कोणते इन्सुलिन योग्य हे ठरविण्यासाठी डॉक्टरच्या सहाय्याने डोस टायट्रेशन (dose titration) करावे.

इन्सुलिन आयुष्यभर घ्यावे लागते का?

इन्सुलिन म्हणजे काही एखादं घातक केमिकल नव्हे, की त्याबद्दलची एवढी भीती बाळगावी! इन्सुलिन हे आपल्या शरीरात बनणारा स्त्राव असून तो आपली साखर आटोक्यात ठेवून दीर्घायुष्य देऊ शकतो, त्यामुळे त्याची भीती अजिबात बाळगू नये, मात्र जरुरीपेक्षा जास्त किंवा कमी इन्सुलिन घेऊ नये. ज्यांना डॉक्टरांनी इन्सुलिन प्रिस्क्राईब केलंय त्यांच्या हिताचा विचार करूनच त्यांनी ते दिलं असणार. त्यामुळे आयुष्यभर घ्यावं लागलं तरी त्याचा बाऊ न करता त्याला जीवन-रक्षक किंवा अमृत-तुल्य समजूनच योग्य प्रमाणात घ्यावं. भोवताली भाकडकथा सांगून दिशाभूल करणारे अनेक अर्धवटराव असतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. कधी कधी जे लोक मधुमेहाची औषधे घेतात त्यांना आजारी पडल्यावर डॉक्टर इन्सुलिन घ्यायला सांगतात पण ते तात्पुरतं असतं. आजारपण संपल्यावर इन्सुलिन बंद केलं जातं. तुमची रक्तातली साखर औषधांनी आटोक्यात येत नसेल तर औषधांसोबत किंवा नुसतं इन्सुलिन घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तो मान्य करणे हेच तुमच्या हिताचे असते.

इन्शुलीन केव्हा आणि कसे घ्यावे?

madhumeha diabetes insulin injection मधुमेह पोटावर इन्सुलिन इंजेक्शन (diabecity.com)

ज्यांना डॉक्टरांनी इन्सुलिन प्रिस्क्राईब केलंय त्यांनी नेहमी जेवण्याच्या अर्धा तास आधी इन्सुलिन घ्यावं. दिवसातून एकदाच इन्सुलिन घ्यायचं असेल तर ते न्याहारीआधी किंवा दुपारच्या जेवणाआधी घ्यावं, पण डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा. एक दिवस घरी ग्लुकोमीटरने दिवसातून ५ ते ६ वेळा रक्तातील साखर तपासून तुम्हाला स्वतःला कळेल की तुमची साखर केव्हा किती वाढते आणि कमी होते. हे तुम्हाला ठावूक झाले तर फार उत्तम! या ग्लुकोमीटरच्या रीडिंग्स डॉक्टरला दाखवून त्यांच्या सल्ल्याने पण तुम्ही डोस ठरवून घेऊ शकता.

इन्शुलीन घेण्याची योग्य पद्धत

इन्सुलिन टोचून घेण्याची सिरींज आणि सुई नेहमीपेक्षा वेगळ्या असतात आणि टोचण्याची पद्धत पण वेगळी असते. केमिस्टकडे मागताना इन्सुलिनची सिरिंज असा उल्लेख करा. इन्सुलिनची सिरिंज आणि सुई दोन्ही अगदी पातळ असतात. इन्सुलिनची वायल (बाटली) हलवून घ्या. तिच्या टोपणावरचे पत्र्याचे गोल आवरण ओपन करा. जेवढे युनिट इन्सुलिन टोचायचे असेल

madhumeha diabetes insulin injection मधुमेह पोटावर इन्सुलिन इंजेक्शन correct method (diabecity.com)
तेवढी वातावरणातली हवा सिरिंजमध्ये ओढून घ्या (दट्ट्या मागे खेचा). आता इन्सुलिनची बाटली सरळ उभी धरून सुईचे टोक संपूर्णपणे बाटलीच्या रबरी बुचातून आत खुपसा. सिरिंजमधली हवा दट्ट्या दाबून बाटलीत इंजेक्ट करा. त्याच अवस्थेत बाटली आणि सिरिंज दोन्ही उलटे करा. आता जेवढे युनिट हवा इंजेक्ट केली तेवढे इन्सुलिन सिरिंजमध्ये खेचून घ्या. सुई बाहेर उपसा. आता पोटावर किंवा जिथे इन्सुलिन इंजेक्ट करायचे असेल त्या जागेवरची त्वचा फोल्ड करून वर उचला (आकृती पहा). सुई खुपसा. दट्ट्या हळूहळू दाबून इन्सुलिन इंजेक्ट करा

पायरी १ : इन्सुलिनची बाटली दोन्ही हातांच्या तळव्यांनी चोळून गरम आणि मिक्स करा

madhumeha diabetes insulin injection मधुमेह पोटावर इन्सुलिन इंजेक्शन correct method (diabecity.com)

पायरी २ : दट्ट्या मागे खेचून सिरिंजमध्ये हवा खेचून घ्या

madhumeha diabetes insulin injection मधुमेह इन्सुलिन इंजेक्शन योग्य पद्धत correct method (diabecity.com)

पायरी ३ : बाटली सरळ उभी ठेवून सिरिंजमधली हवा दट्ट्या खाली दाबून बाटलीत भरा

madhumeha diabetes insulin injection मधुमेह योग्य पद्धत इन्सुलिन इंजेक्शन correct method (diabecity.com)

पायरी ४ : बाटली सिरिंजसकट उलटी करून सिरिंजमध्ये इन्सुलिन खेचून घ्या

madhumeha diabetes insulin injection मधुमेह पोटावर इन्सुलिन इंजेक्शन correct method (diabecity.com)

पायरी ५ : इंजेक्शनच्या जागेवरची त्वचा चिमटा काढल्याप्रमाणे फोल्ड करून वर उचला. सुई खुपसा. दट्ट्या हळूहळू दाबून इन्सुलिन इंजेक्ट करा

madhumeha diabetes insulin injection मधुमेह पोटावर इन्सुलिन इंजेक्शन correct method (diabecity.com)
madhumeha diabetes insulin injection मधुमेह पोटावर इन्सुलिन इंजेक्शन correct method (diabecity.com)

शेजारचे रामराव ४० युनिट इन्सुलिन घेतात पण मला मात्र फक्त १२ युनिटच घ्यायला सांगितलंय!

प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, तसाच प्रत्येकाचा डायबिटीस पण वेगळा असतो. प्रत्येकाचं शरीर इंसुलीनला भिन्न प्रकारे प्रतिसाद देतं त्यामुळे दोन व्यक्तींची वयं सारखीच असली तरी सुद्धा त्यांचा इन्सुलिनचा डोस मात्र अगदी वेगवेगळा असू शकतो. म्हणून इतरांशी तुलना न करता डॉक्टरने सांगितलेला डोस घ्यावा.

इन्सुलिन गरजेपेक्षा जास्त घेतल्यास (इन्सुलिनचा ओव्हरडोस झाल्यास) काय होते?

इन्सुलिन अवसाद (Insulin shock): इन्सुलिन प्रमाणाबाहेर टोचल्यास, अनियमितपणे घेतल्यास आणि ते घेत असताना योग्य असा आहार न घेतल्यास रक्तातील शर्करेचे प्रमाण एकदम कमी होऊन रोग्याला घाम फुटणे, अस्वस्थता वाटणे, हातापायांत कापरे भरणे आणि मानसिक संभ्रम होणे ही लक्षणे होतात. अशा वेळी त्वरित साखर न खाल्ल्यास रोग्याला मूर्च्छा येऊन मृत्यूही संभवतो. म्हणून इन्सुलिन घेत असलेल्या सर्व मधुमेही व्यक्तींनी नेहमीच जवळ साखर बाळगावी व इन्सुलिन शॉकची प्राथमिक लक्षणे दिसल्याबरोबर साखरेचा उपयोग करावा.

इन्सुलिन शरीराच्या कोणत्या भागावर टोचावे?

इन्सुलिन त्वचेच्या खाली दिलं जातं, नेहमीची इंजेक्शन्स जशी स्नायुमध्ये दिली जातात तसे नाही. साधारणपणे पोटावर, मांडीवर अथवा दंडावर दिलं जातं.

madhumeha diabetes insulin injection मधुमेह इन्सुलिन इंजेक्शन घेण्याच्या जागा (diabecity.com)
स्वतःचं स्वतः घेण्यासाठी उत्तम जागा म्हणजे पोटावर! कारण पोटावर मज्जारज्जूंचं (nerve endings) जाळं विरळ असतं, त्यामुळे फार वेदना होत नाहीत. पोटाच्या त्वचेचं क्षेत्रफळ (area) जास्त असल्याने एकाच ठिकाणी पुनःपुन्हा टोचलं जात नाही. मांडीवर किंवा दंडावरही इन्सुलिन टोचलं जाऊ शकतं, पण तिथे जागा (area) कमी असल्याने एकाच ठिकाणी पुनःपुन्हा टोचलं जाऊन त्वचेला सूज किंवा विकृती येण्याची शक्यता बळावते. गाठी झाल्यामुळे ती जागा विद्रूप तर दिसतेच पण गाठींमुळे इन्सुलिनचं शोषण व्यवस्थित होत नाही- त्यामुळे रक्तातली साखर कधी एकदम वाढते तर कधी अचानक कमी होते. म्हणून शक्यतो इन्सुलिन इंजेक्शन पोटावर घ्यावं आणि इंजेक्शनची जागा सतत बदलती ठेवावी. पंधराव्या दिवशी परत त्याच ठिकाणी इन्सुलिन टोचलं तरी चालतं. यासाठी खाली आकृतीत दाखवल्याप्रमाणे मार्कर पेनने मार्किंग्ज करून घ्यावे.

madhumeha diabetes insulin injection मधुमेह पोटावर इन्सुलिन इंजेक्शन (diabecity.com)

तुम्ही आहात पाहुणा क्रमांक: